दुष्कर्म करण्याचा होता डाव; गंभीर कलमांनुसार कारवाई
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहागंज भागातून २२ जुलै रोजी १० वर्षीय चिमुकलीचे भररस्त्यातून अपहरण करणाऱ्या आरोपीच्या गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या. अब्दुल करीम महबूब शेख (वय ३४, रा. रहेमानिया कॉलनी) असे अटकेतील आरोपीचे नाव असून, चोरीच्या रिक्षाचा वापर करून चिमुकलीवर गैरकृत्य करण्याच्या उद्देशानेच तिचे अपहरण केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी सोमवारी
(दि. २७) ही माहिती दिली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आरोपीवर आता अधिक कडक व गंभीर कलमांनुसार कारवाई केली जाणार आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, २२ जुलै रोजी रात्री शहागंज भाजीमंडी परिसरातून आरोपीने रिक्षातून चिमुकलीचे अपहरण केले होते. नागरिकांनी पाठलाग केल्याने ट्रेझरी ऑफिसच्या कंपाउंडजवळ रिक्षा नालीत फसल्यामुळे तो चिमुकलीला सोडून पसार झाला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या सूचनेनुसार आणि
उपायुक्त शशिकांत सातव, पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेची ४ विशेष पथके तपासासाठी नेमली होती. गुन्हे शाखेच्या पथकाने आयुक्तालयातील आणि खाजगी आस्थापनांचे तब्बल २०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून आरोपीचा माग काढला. गुन्हा केल्यानंतर आरोपी अब्दुल करीम हा पळून गेला होता. मात्र तो शहरात होता. सोमवारी (दि. २७) मंजुरपुरा भागात असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. कसून चौकशी
केली असता त्याने अपहरणाची कबुली दिली. ही कारवाई उपनिरीक्षक अर्जुन कदम, अंमलदार काळे, मनोहर गिते, विक्रम खंडागळे, मनोहर त्रिभुवन आणि विजय घुगे यांच्या पथकाने केली आहे. आरोपीला सिटी चौक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
नेमकी घटना काय ?
आरोपी अब्दुल करीम याने २२ जुलै रोजी सायंकाळी रिक्षा (एमएच २० ईएफ ४४२८) चोरली होती. त्याच चोरीच्या रिक्षातून तो रात्री ८:३० वाजेच्या सुमारास शहागंज परिसरात आला.
तेथे कुरकुरे आणण्यासाठी चाललेल्या चिमुकलीला गाठून, तुझी आंटी माझ्या ओळखीची आहे, अशी थाप मारून तिला १०० रुपये दिले आणि रिक्षात बसवून पळवून नेले होते. ट्रेझरी कार्यालयाच्या जवळ नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि रिक्षा नालीत फसल्यामुळे आरोपीने पळ काढला आणि सुदैवाने चिमुकलीची त्याच्या तावडीतून सुटका झाली होती.











